Political News: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राज्यात राजकीय हलचालींना चांगलाच वेग आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा चांगलीच रंगली आहे. अशात उद्धव ठाकरे यांनी नुकतीच मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली आहे. त्यापार्श्वभूमिवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांची देखील आज बैठक संपन्न झाली. आगामी स्थनिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने ही बैठक पार पडली. या बैठकीत शाखा अध्यक्ष नेमणूक, बीएलओची नेमणूक या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. त्यातच उद्धव आणि राज ठाकरे यांच्यातील भेटीमुळे पुन्हा राजकाय वातावरण तापलं आहे. राज ठाकेरेंशी युती करण्यासाठी उद्धव ठाकरे मविआला रामराम ठोकतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता बाळा नांदगावकरांनी काही गोष्टी स्पष्ट सांगितल्या. जाणून घेऊया काय म्हणाले बाळा नांदगावकर.
उद्धव आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर बोलतांना बाळा नांदगावकर म्हणाले, राज ठाकरेंच्या आई या उद्धवजीच्या मावशी आहेत, त्यामुळे काल त्यांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे आले होते. यावेळी दोन्ही नेत्यात संवाद झाला. दोघं नेत्यांमध्ये 10 मिनिटे राजकीय चर्चा झाली. प्रसार माध्यमांमध्ये काही बातम्या दाखविण्यात येत आहे. तुम्ही दाखवत असलेल्या बातम्या प्रमाणे चर्चा झाली असेल. पण, मी किंवा इतर कोणीही तिथे नव्हतो, त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, हे मला माहिती नसल्याचे बाळा नांदगावकर यांनी म्हटले. ठाकरे बंधू एकत्र येताय याचा आनंद आहे. दोन्ही नेत्यांचा स्वतंत्र एक पक्ष आहे. शिवसेनेची परंपरा आहे की, ते दसरा मेळावा करतात, तर आम्ही गुढी पाडवा मेळावा करतो. या निमित्ताने दोन्ही पक्ष आपले आपले विचार मंचावरून मांडतात. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना दसरा मेळाव्याचे निमंत्रण दिले, असे मला वाटत नाही.
शिवसेना मविआ सोडणार?
शिवसेना-मनसे युतीच्या चर्चा सुरु असताना या युतीसाठी उद्धव ठाकरे मविआतून बाहेर पडणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता बाळा नांदगावकर म्हणाले, एकंदरीत विचार केला तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघं भाऊ एकत्र येण्यासाठी सकारात्मक असल्याचे सध्यास्थितीवरुन लक्षात येतं. त्यामुळे ते काहीही निर्णय घेऊ शकतील. परंतू,अजून या मुद्यावर चर्चा नाही, असेही बाळा नांदगावकर म्हणाले. तसेच, मनसे मविआत सामिल होणार का? कॉंग्रेससोबत जाणार का? हा प्रश्न उपस्थित झाला असता, हा हायकमांडचा विषय आहे, त्यावर ते बोलतील. असे म्हणत बाळा नांदगावकर यांनी अधिक बोलणे टाळले.