Muktainagar Crime: जळगाव जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा बोझवारा उडाल्याची वस्तुस्थिती आहे. खून, हाणामारी, चोरी, घरफोडी, दरोड्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून सर्वसामान्य तर सोडा आता मंत्री देखील सुरक्षित नसल्याची वस्तुस्थिती आहे. अशात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुक्ताईनगरातून हा प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी बंदुक दाखवून थेट केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचा पेट्रोल पंप लुटला. गुरुवारी मध्यरात्री झालेल्या या थरारक घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीचा पेट्रोल पंप आहे. राष्ट्रीय महामार्गावर मुक्ताईनगर शहरा लगत रक्षा ऑटो या नावाने हा पेट्रोल पंप आहे. या ठिकाणी गुरुवार 9 ऑक्टोबर 2025 रोजी रात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. पंपावरील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून हा दरोडा टाकण्यात आला.
एक लाखांची रोकड लंपास
दरोडेखोरांनी अगदी फिल्मी स्टाईलने हा दरोडा घातला. दोन दुचाकींवर आलेल्या या दरोडेखोरांनी तोंडाला रुमाल बांधला होता. पेट्रोल पंपावर दाखल होत या दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत दहशत निर्माण केली. यावेळी दरोडेखोरांनी बंदुकीच्या टोकावर कर्मचाऱ्यांना एका खोलीत कोंडले. त्यानंतर पंपाच्या कॅशअर रुममध्ये जात त्या ठिकाणी सामानाची नासधूस करत ड्रॉवरमध्ये ठेवलेली एक लाखांची रोकड घेऊन चोरटे पसार झाले.
शहरात देखील केला दरोड्याचा प्रयत्न
पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याआधी दरोडेखोरांनी मुक्ताईनगर शहरात एक-दोन ठिकाणी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी पेट्रोल पंपाकडे आपला मोर्चा वळविला. या ठिकाणी कर्मचाऱ्यांना मारहाण करत बंदुकीचा धाक दाखवून रोकड लांबवित दरोडेखोर वरणगावच्या दिशेन फरार झाले. दरोडेखोर पसार झाल्यानंतर पंपावरील कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिस व माजी मंत्री एकनाथ खडसे व रक्षा खडसे यांना दिली.
त्यानंतर काही वेळातच मुक्ताईनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यात देखील शहरात एकाच रात्री तीन घरफोड्या झाल्या होत्या. या घटनेतील चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले होते. ही घटना ताजी असताना अता हा दरोडा पडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.