Jalgaon News: राज्यात सध्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वातावरण तापलं आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भगवा आतंकवाद ऐवजी सनातनी आतंकवाद किंवा हिंदुत्ववादी आतंकवाद असे शब्द वापरण्यासंदर्भात वादग्रस्त केले होते. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा हिंदूत्ववादी संघटनांनी तीव्र निषेध केला आहे. या निषेध आंदोलनाचा भाग म्हणून सनातन संस्था आणि समविचारी हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने गुरुवार 21 ऑगस्ट रोजी जळगाव शहरातील स्टेडियम चौक येथे आंदोलन करण्यात आले. पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी आणि सामाजिक शांतता भंग करणारी असल्याचे म्हणत या प्रकरणी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी देखील यावेळी आंदोलकांनी केली.
या आंदोलनानंतर, संघटनांतर्फे अप्पर जिल्हाधिकारी विजय ढगे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात पृथ्वीराज चव्हाण यांच्या वादग्रस्त विधानांची सखोल चौकशी करा माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे सनातन धर्माचा अपमान होत धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहे. याबद्दल पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करावा. भविष्यात अशा प्रकारची विधाने रोखण्यासाठी राजकीय नेत्यांसाठी स्पष्ट आचारसंहिता निश्चित करावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
या आंदोलनात सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, महाराष्ट्र मंदिर महासंघ, हिंदु राष्ट्र समन्वय समिती, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, योग वेदांत सेवा समिती, रणरागिणी समिती, राष्ट्र भक्त अधिवक्ता समिती, स्वामीनारायण संप्रदाय, श्री महाबली ढोल पथक, हिंदू महासभा, अधिवक्ता संघ, वारकरी संप्रदाय, वीर बाजीप्रभु गणेश मंडळ, सकल हिंदू समाज सहभागी झाले होते.