Ganesh Chaturthi 2025: सर्वांना आतुरतेने प्रतिक्षा असलेला गणेशोत्सव आवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला आहे. वैदिक पंचांगानुसार, दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या तिथीपासूनच गणेशोत्सवाला सुरुवात होते. या उत्सव काळात भक्त गणपती बाप्पाची मनोभावाने पूजा करतात. त्यात यंदाचा गणेशोत्सव खास आहे. कारण काही विशेष योगात यंदाचा गणेशोत्सव साजरा होत आहे. चला तर मग, जाणून घेऊया कोणता आहे ‘तो’ राजयोग, तिथी, मुहूर्त आणि पूजाविधी.
ज्योतिषशास्त्रानुसार, यंदा गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत काही ग्रहांची युती होत आहे. त्यामुळे दुर्मिळ आणि शुभ योग जुळून येत आहे. पंचांगानुसार, यंदा भाद्रपद महिन्यातील चतुर्थी तिथी 26 ऑगस्ट रोजी आहे. त्यानुसार, मंगळवार, 26 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजून 54 मिनिटांपासून चतुर्थी तिथी प्रारंभ होईल. तर बुधवार, 27 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजून 44 मिनिटांपर्यंत चतुर्थी तिथी राहील. तिथीनुसार, यंदा गणेशोत्सवाची सुरुवात 27 ऑगस्ट रोजी होईल. या दिवशी भाविक घरोघरी आणि मंडळामध्ये गणपतीची स्थापना करतील. तर शनिवार, 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी असून या दिवशी गणरायाचे विसर्जन केले जाईल.
असा आहे गणेश स्थापनेचा मुहूर्त
हिंदू धर्मात गणेशोत्सवात गणपतीची स्थापना करण्यास विशेष महत्त्व आहे. मात्र, गणेश स्थापनाही शुभ मुहूर्तावर झाली पाहीजे. त्यानुसार, गणपतीची स्थापना करण्याचा सर्वात शुभ वेळ दुपार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, भाद्रपद महिन्यातील चतुर्थी तिथीला गणपती बाप्पाचा जन्म झाला होता. त्यानुसार बुधवार, 27 ऑगस्ट रोजी दुपारी गणपतीची विधीवत पूजा करुन स्थापना केली पाहीजे. त्यानुसार, गणेश स्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी 11 वाजून 05 मिनिटे ते दुपारी 1 वाजून 40 मिनिटांपर्यंत असेल.
जुळून येताय हे शुभ योग
पंचांगानुसार, गणेश चतुर्थीला विशेष योग जुळून येत आहेत. यंदा गणेश चतुर्थी बुधवारी येत आहे. मान्यतेनुसार, बुधवार हा गणपतीच्या पूजेसाठी खास मानला जातो. यासह या दिवशी चार शुभ योग देखील जुळून येत आहे. यात शुभ योग, शुक्ल योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योगाचा समावेश आहे. तसेच हस्त नक्षत्र आणि चित्रा नक्षत्राचा देखील या दिवशी निर्माण होत आहे.
अशी करा गणपतीची पूजा
गणेश चतुर्थीला गणपतीची विधीवत पूजा करण्यास विशेष महत्त्वा आहे. त्यानुसार, सर्वात आधी गणेश स्थापनेपूर्वी ज्या ठिकाणी बाप्पाची स्थापना करणार असाल ते स्थान आधी स्वच्छ करुन त्या ठिकाणी फुले, रांगोळी आणि इतर सजावट करा. त्यानंतर चौरंग किंवा पाटावर लाल किंवा पिवळा कपडा पसरवा. त्यानंतर, पूजेला सुरुवात करण्यापूर्वी हातात पाणी, फुले आणि अक्षद घेऊन ‘ॐ गं गणपतये नमः’ या मंत्राचा जप करा. गणेश मुर्तीला पंचामृताने स्नान घाला. त्यानंतर मुर्तीला नवीन वस्त्र आणि दागिने परिधान करा. गणपतीला दुर्वा, जास्वंदाचे फूल, हळदी कुंकू, तांदुळासह पूजेचे साहित्य अर्पण करत पूजा करा. शेवटी गणपती बाप्पाची आरती करावी.
(टीपः या लेखात दिलेली माहिती ही धार्मिक आणि सामाजिक मान्यतेवर आधारीत आहे. माहिती म्हणून हा लेख वाचकांना देत आहोत. evyaspith.com याची पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)