Kolkata Law College Case : देशात महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. अशात पुन्हा एकदा धक्कादायक अशी घटना समोर आली आहे. कोलकाता येथून हा प्रकार समोर आला असून येथील साउथ कोलकाता लॉ कॉलेजमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला नराधम मनोजित मिश्रा याने साउथ कोलकाता लॉ कॉलेजमधील एका विद्यार्थिनीचे अश्लिल व्हिडीओ तयार करून तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर अत्याचार केला. पीडितेवर अत्याचार झाल्याचे वैद्यकीय तपासणीतून देखील समोर आले असून आरोपीचा डीएनए देखील फॉरेन्सिक पुराव्यांशी जुळला आहे. प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐवढेच नाही तर पोलिसांनी 650 पानी चार्जशीट दाखल केली आहे. या चार्जशीटमधून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहे.
नेमकं काय घडलं?
धक्कादायक असा हा प्रकार 25 जून रोजी, कोलकात्यातील लॉ कॉलेजच्या फर्स्ट सेमिस्टरच्या विद्यार्थिनी सोबत घडला. यात मुख्य आरोपी मनोजित मिश्रा आणि सह-आरोपी जैब अहमद, प्रमित मुखर्जी यांनी पिडीत विद्यार्थिनीचा अश्लिल व्हिडीओ काढत तिला ब्लॅकमेल करुन तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. या प्रकरणातील चौथा आरोपी सुरक्षा रक्षक पिनाकी बनर्जी याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारण सुरक्षा रक्षकाने या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती देण्याऐवजी खोली बाहेरून बंद केली. त्यामुळे त्याला सह-आरोपी करण्यात आले आहे.
गु्न्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवित चौफेर चौकशी केली असता पोलिसांना या प्रकरणाशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज सापडले. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींनी पीडित विद्यार्थिनीला मारहाण करत तिचे अपहरण केल्याचे स्पष्ट दिसत आहे. यासह आरोपींच्या मोबाईलमध्ये पीडित विद्यार्थिनीचे अनेक अश्लील व्हिडीओ मिळून आले. यासह आरोपिंच्या मोबाईलचे लोकेशन देखील घटनास्थळी आढळली, असे चार्जशीटमध्ये म्हटले आहे.