Bhusawal News: भुसावळ तालुक्यातील दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रात पुन्हा अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे. या ठिकाणी 39 लाख 37 हजार 500 रुपये किंमतीची तांब्याची तार गहाळ झाली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी मोठ्याप्रमाणात सुरक्षा रक्षक आणि सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक उपाययोजना असताना हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वीज निर्मितीच्या बाबतीत महत्त्वाचे असलेले दीपनगर येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्र कायम चर्चेत राहतं. येथील भोंगळ कारभार सर्वश्रुत असून अनेक वेळा विधानसभेत देखील यावर आवाज उठवण्यात आला आहे. तरी देखील दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील भोंगळ कारभार थांबता थांबेना अशी स्थिती आहे. अशात पुन्हा एकदा या ठिकाणी लाखों रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे.
40 लाख रुपये किंमतीची तांब्याची तार लंपास
दीपनगर औष्णिक वीज केंद्रातील 132/33 के.व्ही. उपकेंद्रात मोठा अपहार झाला आहे. दि. 27 सप्टेंबर 2009 ते 27 मे 2025 दरम्यान हा उपहार झाला आहे. यात 39 लाख 37 हजार 500 रुपये किंमतीची तांब्याची तार संगनमताने गहाळ करण्यात आली आहे. या प्रकरणी उपकार्यकारी अभियंता पारेषण ब्रिजेंद्रकुमार पटेल यांनी फिर्याद दिल्याने भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावित यांच्यासह पोलीस निरिक्षक महेश गायकवाड यांनी भेट देत पाहणी केली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरिक्षक महेश गायकवाड करीत आहे.