Muktainagar News: नवरात्रीनिमित्ताने मुक्ताईनगर जवळ असलेल्या ईच्छादेवी मातेचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. दुचाकीसमोर डुक्कर आल्याने झालेल्या अपघातात बुलढाणा जिल्ह्यातील एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, मुक्ताईनगर तालुक्यात देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्यांचा हा आठवडाभरातील दुसरा अपघात आहे.
याबाबत माहिती अशी की, पातुर्डा, ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा येथील रहीवासी असलेले राम रमेश नंदाणे, अभिजीत प्रमोद म्हसाळ व दीपक मारोती इंगळे हे तिघे जण मोटारसायकलने ईच्छादेवी मातेचे दर्शन घेण्यासाठी आले होते. देवीचे दर्शन घेऊन परत जात असताना राम नंदाणे हे बजाज सीटी 100 मोटारसायकल क्रमांक एम.एच. 28 बी.एन. 0166 चालवित होते. तर अभिजीत प्रमोद म्हसाळ व दीपक मारोती इंगळे हे मागे बसले होते. तिघे मोटारसायकलने जात असताना चिंचखेडा ते तालखेडा दरम्यान समोर डुक्कर आल्याने त्याला वाचविण्याच्या नादात मोटारसायकलचा अपघात झाला. हा अपघात इतका भिषण होता की, राम नंदाणे यांचा मृत्यू झाला तर अभिजीत म्हसाळ आणि दीपक इंगळे हे दोघे गंभीर जखमी झाले.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत जखमींना रुग्णालयात हालविले. तर सहाय्यक पोलीस निरिक्षक जयेश पाटील यांच्यासह पथकाने घटनास्थळी पंचनामा केला. या प्रकरणी अविनाश नंदाणे यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आठवड्याभरात दुसरा अपघात
देवीचे दर्शन घेऊन परतताना हा आठवडाभरातील दुसरा अपघात आहे. या आधी 26 सप्टेंबर 2025 रोजी देखील भिषण अपघात झाला होता. मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड फाट्याजवळ हा अपघात झाला होता. या अपघातात राष्ट्रीय महामार्गावरुन मुरूमची वाहतूक करणाऱ्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक देत एकाच कुटुंबातील चौघांना चिरडले होते. या अपघातात पती-पत्नी सह लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
या अपघातात मातापुर, जि. बुऱ्हानपूर (मध्यप्रदेश) येथील नितेश जगतसिंग चव्हाण वय 32, सुनिता नितेश चव्हाण वय 25, शिव नितेश चव्हाण वय ७ यांचा मृत्यू तर निहाल सिंग नितेश सिंग चव्हाण वय 10 हा मुलगा जखमी झाला होता. चव्हाण कुटुंबिय ईच्छापूर येथील ईच्छादेवीच्या दर्शनासाठी ते कुटुंबासह निघालेले होते. रस्त्यातच त्यांना डंपर क्रमांक एम.एच. 19 सी.एक्स. 2038 ने चिरडले होते.




