Bhusawal Crime News: गुन्हेगारीच्या बाबतीत कुप्रसिद्ध असलेले भुसावळ शहर पुन्हा एकदा हादरले आहे. शहरात चाकू हल्ल्याची घटना घडली. शिवाजी नगर परीसरातील डी.एल. हिन्दी हायस्कूलच्या प्रांगणात दोन गटात झालेल्या हाणामारीतून हा प्रकार घडला आहे. या घटनेत एकाने चौघांवर चाकूने हल्ला केला. 18 सप्टेंबर 2025 रोजी घडलेल्या या घटनेमुळे हायस्कूलमध्ये धावपळ उडाली होती. घटना घडल्याच्या काही तासातच पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले होते. तर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे तसेच सपोनि नितीन पाटील यांनी भेट दिली.
डी.एल. हिन्दी हायस्कूलच्या प्रांगणात विद्यार्थिनी खेळत असतांना विद्यार्थिनींची छेड काढल्याच्या कारणावरुन हा प्रकार घडला होता. यात दोन गटात सुरुवातीला शाब्दीक चकमक होत एकाने काही कळण्याच्या आत दुसऱ्या गटातील चौघांवर चाकू हल्ला केला. हा संपुर्ण घटनाक्रम डी.एल. हिंदी हायस्कूलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी घटनेच्या काही तासात ताब्यात घेतले होते तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी रात्री उशीरा गुन्हा दाखल होत परस्पराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानुसार, पहिल्या फिर्यादीनुसार, मिनाज शेख राऊफ कुरेशी या विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरुन प्रणय निहारे, आदिल खान मुकील खान, भावेश बहिरुणे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या फिर्यादीत आदील खान मुकील खान याच्या फिर्यदीवरुन साहिल ढोल्या, नावेद शेख व सोहेल कुरेशी यांच्या विरुद्ध मारहाण करत जखमी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक मंगेश जाधव आणि सहाय्यक पोलिस निरिक्षक नितीन पाटील करीत आहे.




